वाळूज शिवारातून बारा मोटारींची वायरचोरी

Foto
वाळूज महानगर, (प्रतिनिधी): वाळूज शिवारात अज्ञात चोरट्यांनी १२ शेतकऱ्यांच्या खाम नदी तिरावरील तर काहींच्या शेतातील पाण्याच्या मोटारींचे साहित्य व तांब्याच्या वायर चोरून नेल्या. यात ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी शेख इब्राहिम शेख अजीज, रा. रामराई टी पॉईंट, वाळूज यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची शेती वाळूज शिवार गट नंबर १८३ मध्ये आहे. बुधवारी (दि.२५) सकाळी ८ वाजता ते नेहमीप्रमाणे शेतात मोटार चालू करण्यासाठी गेले असता, पाणी पंपाची वायर दिसून आली नाही. 

शेख इब्राहिम शेख अजीज, श्रीरंग किसन तुपे, रंगनाथ मुरलीधर भुजंग, महेबुब नवाज पठाण, बादशहा खाँ अनुझ खाँ, संदीप तुपे, प्रेमानंद शहाजी साबळे, इम्रान रशीद शेख, राजाराम भिमराव मांडे, रतीलाल फुलचंद घुनावत, राधेशाम गोवर्धन राजपूत, किरण विष्णू माने या सर्व शेतकऱ्यांचा एकूण सुमारे ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. दरम्यान, चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी नंदकुमार राऊत, दयानंद साबळे आदींनी केली.